निफाड तालुक्यातील ओझर येथील खाजगी दियान स्कूलच्या बसचा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास सय्यद पिंपरी जवळ अपघात झाला. या बसमध्ये एकूण २१ विद्यार्थी होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी या बसमध्ये होते.त्यासोबतच स्कूलबसचा ड्रायव्हर दारू पिऊन बस चालवत असल्याचे प्रत्यक्ष दर्शकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूल या खाजगी स्कूलची बस क्रमांक MH.15.EF.0289 ही बस रोजच्याप्रमाणे एक वाजेच्या सुमारास विद्यार्थी सोडण्यासाठी निघाली. परंतु या बसचा चालक दारू पिलेला असल्यामुळे सय्यद पिंपरी ला जात असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेच्या बाजूला दोन पलट्या खाऊन खाली गेली.
मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ताबडतोब बसकडे धाव घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन-तीन मुलांना मुकामार, तसेच कमरेला लागल्यामुळे पालकांनी दियान स्कूल बस चालवणाऱ्या बॉडीवर व शिक्षक वर्गावर संताप व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे ज्या स्कूल बस चा अपघात झाला आहे त्या बसची कागदपत्रांची व इतर परवानगी संपुष्टात आली असतानाही बस विद्यार्थ्यांसाठी का चालवतात? तसेच या बसवर असलेला चालक दारू पिलेला असतानाही शिक्षकांनी व स्कूल बस चालवणाऱ्या बॉडीने दारू पिलेल्या ड्रायव्हर कडे बस दिलीच कशी असे प्रश्न पालक उपस्थित करत आहे.