नाशिक : हृदयद्रावक ! मद्यपी कारचालकाच्या धडकेत १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
नाशिक : हृदयद्रावक ! मद्यपी कारचालकाच्या धडकेत १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : दारूच्या नशेत कार चालवून भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 15 वर्षीय युवकाला धडक दिल्याने या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुरेश देवराम भोये हे उसाचा रस विक्रीचा व्यवसाय करतात. वडिलांना हातगाडीवर मदत व्हावी म्हणून त्यांचा मुलगा मयूर (वय 15) हा काल ऊसाचा रस विक्रीसाठी तवलीफाटा येथे रस्त्याच्या कडेला रस काढत होता. त्यावेळी आरोपी अमोल रमेश ढगे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) व त्याचा साथीदार गणेश उत्तम पेलमहाले (रा. चाचडगाव, ता. दिंडोरी) यांनी गाडीतच दारूचे सेवन केले होते. 

गणेशने अमोलला दारूच्या नशेत असताना देखील स्कॉर्पिओ गाडी चालविण्यास उत्तेजित केले. त्याने दारूच्या नशेत एम.एच.15 के.के. 6464 या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात चालवून विरुद्ध दिशेने येत मयूरच्या अंगावर गाडी घातली. या अपघातात मयूरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर मयूरला त्याच्या वडिलांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर मार लागला असल्याने त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमोल ढगे व गणेश पेलमहाले यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी करीत आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group