मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात झाला असून देवदर्शनासाठी निघालेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून, त्यात तीन महिला आणि एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर या भीषण अपघातात ८ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पंढरपूर ते सोलापूर महामार्गावर शरद नगर, मल्लेवाडी येथे हा भीषण झाला. या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे.
नेमकं काय घडलं ?
सोमवारी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविकांची गाडी मंगळवेढामार्गे पुढील प्रवासासाठी जात होती. सायंकाळच्यावेळी ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने भाविकांची गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय. ८ जण गंभीर जखमी झाले आहे.
पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात डोंबिवली–दिवा परिसरातील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १४ वर्षीय आदित्य गुप्ता यांच्यासह योगिनी केकाने, सविता गुप्ता आणि सोनम आहिरे या तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी दोघे उमेश नगर, डोंबिवली पश्चिम येथील तर दोघे दिवा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाहन ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.