युद्धाच्या झळा : घरगुती गॅसचा अवैध वापर,  महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल
युद्धाच्या झळा : घरगुती गॅसचा अवैध वापर, महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या LNG (द्रवीकृत नैसर्गिक वायू) पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने देशभरात ‘अत्यावश्यक वस्त कायदा 1955’ लागू केला असून महाराष्ट्रात व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. 

दरम्यान घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपुरातील सांगोला नाका इथं अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर रिक्षात भरून विक्री केली जात होती. जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश बोरीकर यांच्याविरोधात पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवैध पद्धतीने गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर देखील अशाच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सातनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे गोंदियातही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दोन हॉटेल्सवर कारवाई केली आहे. या हॉटेल्समधून 7 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. 

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतात देखील बसत असून एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असून हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याचं गोंदिया जिल्ह्यातही पहायला मिळालं. गोंदिया जिल्हा प्रशासनाने गोंदिया आणि तिरोडा या ठिकाणी दोन कारवाया केल्या असून यामध्ये 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group