श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि वेळेत दर्शन मिळावे. यासाठी तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
याकामी ऑनलाइन संगणक प्रणाली राबवण्यासाठी टीसीएस कंपनीने मंदिर समितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. टीसीएस कंपनी मंदिर समितीला टोकन दर्शनासाठी मोफत संगणक प्रणाली देणार आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , याविषयीची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर समितीच्या बैठकीत दिली. तसेच आळंदी येथे मंदिर समितीचे भक्तनिवास बांधण्याचा ठराव देखील बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात. विठ्ठल मंदिर राज्यातील एक प्रमुख देवस्थान आहे. भाविकांची गर्दी पाहता आधुनिक सोयी-सुविधा वाढवण्याची गरज आहे. त्यातूनच विठ्ठलाचे टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.