राज्यात अतिवृष्टी?  काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?
राज्यात अतिवृष्टी? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?
img
Vaishnavi Sangale
महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत काल रात्रीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे.दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली असली तरी, सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत.

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या भरती-ओहोटीच्या वेळापत्रकानुसार, २४ ते २७ जुलै या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे. आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी समुद्रात ४.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर उद्या २६ जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. तसेच, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माळशेज घाटात पाऊस आणि धुक्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. दरीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत आणि समोरुन येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने प्रवास जीवघेणा ठरत आहे. 

विदर्भात आज संपूर्ण दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर नागपूर, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group