साई भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणतांबा -साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. ज्याचा अंदाजे खर्च ₹२३९.८० कोटी आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केलेला हा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंगचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश प्रमुख विभागांमध्ये रेल्वे क्षमता वाढवणे आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार,रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणतांबा -साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे.हा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंगचा एक भाग आहे.
प्रकल्प क्षेत्राच्या जवळील परिसरात अहमदनगर, पुणतांबे, शिर्डी आणि नाशिक रोड मार्गे पुणे–नाशिक नवीन जोडणाऱ्या मार्गासाठी अंतिम सर्वेक्षणाची कामे सध्या प्रगतीपथावर सुरू आहेत. हा प्रस्तावित मार्ग एक नवीन रेल्वे वाहतूक मार्ग म्हणून कार्य करणार असून, दोन अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमधील रेल्वे संपर्क अधिक बळकट करणार आहे.
दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणतांबा- साईनगर शिर्डी मार्गावरील ताण कमी होईल. सध्या या विभागाचा वापर केवळ १९.६६% इतका आहे. मात्र, भविष्यात दुहेरीकरणाशिवाय वापर क्षमता ७९.७०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मार्गावर ताण वाढू शकतो. पुणतांबा आणि साईनगर शिर्डी हे दोन्ही शहर आधीच रेल्वे मार्गाने जोडले गेले असून या मार्गावर अनेक ट्रेन धावत आहेत. या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीला रेल्वेची जोडणी सुलभ होणार आहे.