विधानभवन परिसरात दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती, त्यानंतर दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली होती.
त्याआधीही आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये एकाला मारहाण केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी गंभीर परिस्थिती – उद्धव ठाकरे
याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज दिसत आहे, आपण आधी आमदाराची बॉक्सिंग पाहिली, काल विधिमंडळाच्या आवारात हाणामारी झाली. महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल अशा या घटना आहेत. विधिमंडळात किंवा विधानभवन परिसरात गुंडागर्दी होत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.’
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सर्व पक्षांनी एकत्र बसून पक्षातील गुंडांना पदावरून हटवलं पाहिजे. विधीमंडळ परिसरात असा राडा होत असेल तर देशामध्ये राज्याची प्रतिमा काय झाली असेल? याआधी असं कधी घडलं नव्हत. लोकशाहीचा खून करणारे असेल लोक विधिमंडळात वावरायला लागले तर जनतेने काय करायचं?’