दैनिक भ्रमर : कबुतरखाना बंदीप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कबुतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने तज्ज्ञ समिती नेमण्याबाबतही कोर्टाच्या सूचना आहेत. या तज्ज्ञ समितीचीही आज कोर्टात घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन करण्यात येणार आहे.
जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उत्तर देण्यात येणार आहे. मंगळवारी रात्रीच मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतर खाना परिसरातील दुकान दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 150 मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कबूतरखाना परिसराला आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर छावणीचे स्वरुप पाहायला मिळत आहे.