मुंबई : लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधानभवनात गुरुवारी अत्यंत लाजिरवाणा प्रकार घडला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनामध्येच राडा झाला. या राड्यानंतर मध्यरात्रीही मोठ्या घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले.
गुरुवारी रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात जोरदार पडसाद उमटले. विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राडा झाल्याचे पहायला मिळाले.
मारहाण करणाऱ्यांना सोडून पोलिसांनी मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी समर्थकांसह ठिय्या मांडला. विधान भवनाच्या गेटवर मध्यरात्री एक वाजता जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाल होतं.
विधानभवन परिसरात झालेल्या राड्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत धरपकड सुरु केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकल साठी नेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील घटनास्थळी हजर होते. विधिमंडळाचे अधिवेशन आज, 18 जुलै रोजी संपणार आहे.
आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेल्या वाद आणि त्यानंतर आलेल्या धमक्यांविषयी माहिती दिली. यानंतर विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला.
गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची झाली. "यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत आहेत" असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.