दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. विमान अपघात तपास ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. हे बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश मिळालं आहे. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅंडर्डनुसार पुरावेनिष्ठ तपास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. तसेच केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे, असंही रोहित पवारांनी सांगितले. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी 5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र अजितदादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.