महाराष्ट्राच्या दादाची कर्नाटकात ‘Zero FIR’; कटकारस्थान, बनावट कागदपत्र...अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी केलेल्या FIR मध्ये काय?
महाराष्ट्राच्या दादाची कर्नाटकात ‘Zero FIR’; कटकारस्थान, बनावट कागदपत्र...अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी केलेल्या FIR मध्ये काय?
img
वैष्णवी सांगळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या सखोल चौकशीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. हा मुद्दा त्यांनी चांगला लावून धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल केला जावा यासाठी ते प्रतत्न करत होते. अखेर सोमवारी कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने एफआयआर दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता महाराष्ट्र पोलीस दलाची जबाबदारी वाढली असल्याचे म्हटले आहे



अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी 'झीरो एफआयआर' (Zero FIR) दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ अपघात नसून एक "मोठा गुन्हेगारी कट" असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्यामुळे, रोहित पवारांनी बंगळुरू पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली, जी आता तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. 

रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असल्याचे म्हटले आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल (सोमवार, दि. २३ मार्च) कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला, याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू…! हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू!
#महाराष्ट्र_धर्माने आम्हाला लढायला शिकवलं असून या शिकवणुकीप्रमाणे काम करत राहू..!

कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवण्यात आलेल्या ‘Zero FIR’ मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत. या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान असल्याचा संशय रोहित पवार यांचाकडून व्यक्त करण्यात आला आहे. FIR मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तक्रारीत विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले असून, उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती, असा आरोप आहे. याशिवाय विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती (अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यात फरक), पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल, तसेच संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असू शकते, म्हणून सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या झीरो एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group