बारामती: अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आज सकाळी सभास्थळी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. आज होणाऱ्या या सभेला राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि महायुतीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार असून, संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष या सभेवर लागले आहे.
दादांच्या आठवणी आणि कुटुंबाची साथ
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, "दादांच्या (अजित पवार) आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत आणि त्या लोकांच्या भावनांमधून स्पष्टपणे जाणवत आहेत." या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित राहणार आहेत.
खासदार सुप्रिया सुळे या सभेला येणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे त्यांचा निरोप आला नसला तरी, कुटुंबातील बहुतांश सदस्य सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे असल्याचे यावरून दिसून येत आहे.
'मिशन रेकॉर्ड ब्रेक': पार्थ पवारांचे मतदारांना साकडं
खासदार पार्थ पवार यांनी यावेळी विजयापेक्षा मताधिक्यावर भर दिला आहे. "सुनेत्रा वहिनी निवडून येणार हे निश्चित असले तरी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. अजित दादांनी प्रस्थापित केलेला २ लाख १७ हजारांच्या मताधिक्याचा विक्रम आपल्याला मोडीत काढायचा आहे. त्यामुळे मतदारांनी घरात बसून न राहता मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे," असे आवाहन पार्थ पवार यांनी केले आहे.
पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी
२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या रिक्त जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार दिला होता, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी माघार घेतली. सध्या जरी २२ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत सुनेत्रा पवार या किती मताधिक्याने जिंकणार, याभोवतीच फिरताना दिसत आहे..