राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ ला बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अपघाती निधनाला 28 मार्चला दोन महिने पूर्ण होतील. परंतु, अद्यापही या प्रकरणी कोणावरही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. अजितदादांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत अनेक पत्रकार परिषद घेत हा अपघात नाही तर घात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान सोमवारी आमदार चेतन तुपे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी असंख्य प्रश्न उपस्थित करत आमच्या नेत्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला विलंब होत असून अजूनही व्हीएसआर कंपनीच्या मालकावर कारवाई झालेली नाही. व्हीएसआर कंपनीविषयी तक्रारी असूनही कंपनीवर सरकार मेहरबान का, या कंपनीला अद्याप काळ्या यादीत का टाकले नाही, असे सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी सोमवारी विधानसभेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप केला.
मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित केली आहे. या चर्चेत सहभागी होताना तुपे यांनी विमान अपघाताच्या चौकशीला होत असलेल्या विलंबाबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना अजितदादांच्या आठवणीने गहिवरून आले.
चेतन तुपे यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील देत विविध शंका उपस्थित केल्या. मुंबईत सकाळी साडेसात वाजेपर्यंत रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी नसते. मग अशावेळी नियोजित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला म्हणून ऐनवेळी विमानाचा पायलट आणि क्रू का बदलण्यात आला, ऐनवेळी पायलट बदलणे हे संशयास्पद आहे. दादांचे विमान पात्र ठरवणारा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर कोण, त्याचे नाव काय, की एका विमानाऐवजी दुसरे विमान दिले, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. बारामती विमानतळाची दृश्यमानता कमी होती तर वैमानिकाने विमान उतरवण्याचा हट्ट का धरला? त्यासाठी वैमानिकावर कुणाचा दबाव होता का? बारामती एटीसीने विमानाला लँडिंगची परवानगी का दिली? रडारच्या सिग्नलवरून विमान अचानक गायब कसे झाले, अशा प्रश्नांच्या फैरी झाडताना तुपे यांनी व्हीआरएस कंपनीचे मालक आणि वैमानिक यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.
विमान अपघाताच्या ठिकाणी अजितदादा वापरत असलेले मोबाईल आणि त्यांचे घड्याळ सुस्थितीत आढळले. मोबाईल आणि घड्याळ सापडते तर विमानातील ब्लॅकबॉक्स जळला यावर महाराष्ट्राने विश्वास का ठेवावा, असा सवाल करत चेतन तुपे यांनी विमान अपघाताचे तांत्रिक विश्लेषण होऊन फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली. आमच्या नेत्याच्या विमानाला झालेल्या अपघाताची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत. ही उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनाला शांती लाभणार नाही, असे ते म्हणाले.