कांद्याला मिळत असलेल्या कमी दराविरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चांदवड येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर येत आहेत.
कांद्याला मिळत असलेल्या कमी दराविरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव आणि विकलेल्या कांद्यावर 15 रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, शिवसेनानेते अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी रोहित पवार, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.