नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एक अल्पवयीन मुलीने आश्रम शाळेतच बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली आहे., नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की ही घटना मोहनदरी आदिवासी आश्रम शाळेत घडली असून, अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एक अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात पाठवले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभर खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेखी आणि आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आश्रम शाळेत नियमित आरोग्य तपासणी होत असताना एवढी गंभीर बाब इतके दिवस कशी लक्षात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, प्रकरणाची खाते अंतर्गत सखोल तपासणी सुरू केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली होती.
या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक स्तरावर होत आहे.