चंद्रपूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आलीआहे. घरात खुंटीला टांगलेल्या पँटच्या खिशात हात घातल्याने एक मुलगा थेट मृत्यूच्या दाढेत अडकला होता. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले आहेत.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथील आहे. मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या १२ वर्षीय मुलाचं नाव अनुप ईश्वर ढोणे असं आहे. चार दिवसांपूर्वी अनुपने घरात खुंटीला अडकवलेल्या पँटमध्ये हात घातला होता. मात्र हात घालताच त्याच्या हाताला आतमध्ये दडून बसलेल्या एका विंचवाने दंश केला.
विंचवाने दंश केल्यानंतर अनुपची तब्येत झपाट्याने खालावली आणि तो अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचला होता. विंचू चावल्यानंतर अनुपच्या पालकांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्याऐवजी आधी गावातच घरगुती उपचार सुरू केले. पण अशा उपचारांमुळे मुलाची प्रकृती अधिकच खालावली
मुलाची गंभीर अवस्था पाहता, डॉ. आनंद बेंदले यांनी तातडीने उपचार सुरू केले. सलग ३ दिवस अनुपवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. डॉ. बेंदले आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न करून अखेर अनुपचे प्राण वाचवले. आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यात वेगाने सुधारणा होत आहे.
विंचू किंवा साप चावल्यानंतर पहिला एक तास (गोल्डन अवर) अत्यंत महत्त्वाचा असतो. या घटनेत पालकांनी सुरुवातीला गावठी उपचार केल्याने मुलाचा जीव धोक्यात आला होता. त्याचा बीपी शून्यावर गेला होता. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण डॉक्टर वाचवू शकले. पावसाळ्याच्या दिवसांत कपडे किंवा बूट घालण्यापूर्वी ते नीट झटकून पाहावेत. घरात अंथरूण-पांघरूण घेताना किंवा खुंटीवरील कपडे वापरताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलं आहे.