सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पती पत्नीमध्ये अनेक वाद विवाद हे होतच असतात पण अनेकदा हे वाद विवाद टोकाला जातात. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निशा चौहान (वय 40) यांची शुक्रवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पतीने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती प्रदीप चौहान (वय 42) याने स्वतःवरही चाकूने अनेक वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर घरातील मुलांनी आरडाओरडा करत घराबाहेर धाव घेतली. मुलांचा आवाज ऐकून शेजारी तातडीने घरात पोहोचले. त्यावेळी घराच्या फरशीवर निशा चौहान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तर काही अंतरावर प्रदीप चौहान गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी निशा चौहान यांना मृत घोषित केले. प्रदीप चौहान यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात या हत्येमागे 1,170 चौरस फूट जमिनीच्या नोंदणीचा वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जमिनीची नोंदणी शुक्रवारीच होणार होती. निशा चौहान यांची इच्छा होती की ती जमीन त्यांच्या नावावर नोंदवली जावी. मात्र प्रदीप चौहान यांचा त्यास विरोध होता. याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण घटनेत झाले.
घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. पोलिसांनी घरातील मुलांची चौकशी केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ही घटना सरूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हर्रा कस्बा येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्रा कस्बा येथे निशा चौहान आपल्या पती प्रदीप चौहान, दोन मुलगे देव (वय 17), शुभ (वय 16) आणि मुलगी एंजेल (वय 12) यांच्यासोबत राहत होत्या. निशा चौहान ब्युटी पार्लर चालवत होत्या. त्यांना सोशल मीडियावर रिल्स तयार करण्याची विशेष आवड होती. इन्स्टाग्रामवर त्यांनी स्वतःचा परिचय रील क्रिएटर, ब्युटिशियन आणि अभिनेत्री असा दिला होता. तर प्रदीप चौहान एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.