अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावलेल्या मेघराजाने अखेर जोरदार एंट्री केली आहे. जुलै महिन्याच्या पाहिल्या दिवसापासूनच पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील 72 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये अवघ्या 24 तासांत 200 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांनाही विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.