ठाकरेंच्या ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला असून अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता ओमराजे निंबाळकर यांनी यावर आपलं मत स्पष्ट केलं आहे.
खासदार ओमराजेंनना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ओमराजे म्हणाले की, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही, अतिशय प्रामाणिकपणे हे मी कबूल करू इच्छितो. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे. धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलो आहे. माझी प्राथमिकता मंत्री होणे नाही, सर्वसामान्य माणसाची काम करणे हीच माझी प्राथमिकता असणार आहे.
पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, ‘मी रोज सामान्य माणसाच्या संपर्कात असतो, सर्वसामान्य माणसांच्या अडचणी फार मोठ्या आहेत, ती माझी प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्या माणसाचं काम करणं माझी जबाबदारी आहे. आता सत्यची जोड मिळाल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने सामान्य माणसांच्या कामाला येईल. सामान्य माणसाच्या कामातून मी माझ्यावरील सगळ्या टीकेला उत्तर देईल.’