नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सराड, घागबारी, हरणटेकडी, रोटी, वाझुळपाडा आणि शिंदे दिगरसह आसपासच्या परिसरात आज दिवसभरात भूकंपाचे सलग पाच सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसले, तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कळवण तालुक्यातील दळवट आणि पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरात दुपारी ३:३८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. सध्या या सर्व भागांमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि त्यामागील तांत्रिक कारणांची सविस्तर तपासणी करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी दिल्ली येथील विशेष तज्ज्ञ पथक तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आहे. हे पथक बाधित भागांची पाहणी करून आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.