डाबर इंडिया कंपनीचे प्रॉडक्टला मोठी मागणी असून या कंपनीवर लोकांची मोठी विश्वासहर्ता आहे. परंतु आता या कंपनीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. डाबर इंडियाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून मोठा धक्का बसला आहे. कंपनीच्या काही खाद्य उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश FSSAI ने दिले आहेत.
उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आणि जाहिरातींमध्ये करण्यात आलेल्या '100%' दाव्यांमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते आणि हे दावे विद्यमान अन्न लेबलिंग नियमांशी सुसंगत नसल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित उत्पादनांची विक्री थांबवून नियमांनुसार आवश्यक बदल करण्याचे निर्देश डाबरला देण्यात आले आहेत. मात्र, ही कारवाई उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत नसून त्यांच्या लेबलिंग आणि जाहिरातींमधील दाव्यांशी संबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
FSSAI ची ही कारवाई मध, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल, तिळाचे तेल, देशी तूप, नारळाचे पाणी आणि नारळाचे दूध यासह अनेक उत्पादनांना लागू होते. एफएसएसएआयने कंपनीला १५ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
एफएसएसएआयच्या मते, डाबर आपल्या वेबसाइटवर आणि काही उत्पादनांवर १००% नैसर्गिक, १००% शुद्ध, १००% शुद्धतेची हमी, आणि १००% सेंद्रिय असे दावे करत होते. एफएसएस विनियम, २०१८ अंतर्गत, असे १००% दावे अस्पष्ट आहेत, त्यांची पूर्णपणे पडताळणी करता येत नाही आणि ते ग्राहकांची दिशाभूल करू शकतात, असे एफएसएसएआयने म्हटले आहे. या उत्पादनात अनियमितता आढळली तपासादरम्यान, डाबर हिमालयन ऑरगॅनिक ॲपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक हनी यांनी वैध FSSAI सेंद्रिय मंजुरीशिवाय 'ऑरगॅनिक इंडिया' लोगोचा वापर केला होता. डाबर होममेड कोकोनट मिल्कवरील १००% शुद्धता हा दावा देखील नियमांचे उल्लंघन करणारा होता.
या दाव्यांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात कंपनीला यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. FSSAI च्या मते, कंपनी समाधानकारक सुधारणात्मक कारवाई करण्यात अयशस्वी ठरली. परिणामी, आता संबंधित उत्पादनांची विक्री थांबवण्याचा निर्देश जारी करण्यात आला आहे, असे FSSAI ने म्हटले आहे. FSSAI ने डाबर इंडियाला १५ दिवसांच्या आत कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या, ही कारवाई दिशाभूल करणारे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन या कारणांवरून करण्यात आली आहे.