तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी
तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी
img
Nandini khandare More

 
नाशिकमध्ये  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, संप्रेषण व्यवस्था आणि पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित तांत्रिक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने शुक्रवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात बैठक घेतली. त्यानंतर समितीने नाशिकमधील प्रमुख कुंभस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित तांत्रिक सुविधांचा आढावा घेतला. समिती आज (ता. १) त्र्यंबकेश्वरमधील कुंभस्थळांची पाहणी करणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य प्रा. दीपांकर चौधरी (आयआयटी मुंबई), महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव रतनसिंह परदेशी, तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाने सिंहस्थ २०२७ साठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन आराखडा, कमांड अँड कंट्रोल व्यवस्था, सीसीटीव्ही नेटवर्क, संप्रेषण प्रणाली, पूर्वसूचना यंत्रणा आणि इतर तांत्रिक उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रस्तावित तांत्रिक प्रणालींची आवश्यकता, त्यांची उभारणी, तैनाती आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यावर समितीने सविस्तर चर्चा केली.

बैठकीनंतर समितीने नाशिकमधील प्रमुख कुंभस्थळांची पाहणी करून तेथील भौगोलिक परिस्थिती, भाविकांच्या हालचालीचे संभाव्य मार्ग, नियंत्रण व्यवस्था आणि विविध तांत्रिक प्रणालींच्या प्रस्तावित स्थापनेचा आढावा घेतला. या पाहणीच्या आधारे समिती शासनाला आवश्यक तांत्रिक शिफारशी सादर करणार असून त्यानुसार सिंहस्थासाठी प्रस्तावित तांत्रिक यंत्रणांच्या अंमलबजावणीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. उद्या समिती त्र्यंबकेश्वर येथील कुंभक्षेत्राची पाहणी करून तेथील प्रस्तावित व्यवस्थेचाही आढावा घेणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group