एका डॉक्टरच्या हलगर्जीपणाची अतिशय धकाकदायक घटना समोर आली आहे. पायाचा उपचारासाठी गेलेल्या महिलेची डॉक्टरने हृदयाची सर्जरी केली ज्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या पायात फ्रॅक्चर होता पण डॉक्टरांनी चुकून त्या महिलेची हार्ट सर्जरी केली आणि हृदयात स्टेंट टाकला.
ही घटना हरियाणातील पानीपत जिल्ह्यात एका खाजगी रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात पायाच्या फ्रॅक्चरच्या उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाच्या हृदयात डॉक्टरांनी स्टेंट टाकले. ऑपरेशननंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. कुटुंबीयांचा आरोप आहे की महिलेला पायातील तुटलेल्या हाडाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना न सांगता हृदयात स्टेंट टाकले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे
मृत महिलेची ओळख ४२ वर्षीय गुड्डी देवी अशी झाली आहे. त्या पानीपतमधील रमेश नगर येथील रहिवासी होत्या. मृत महिलेचा मुलगा कुलदीप यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, २१ जुलै रोजी गाझियाबादमध्ये झालेल्या एका अपघातात त्यांच्या आईच्या पायाचे हाड तुटले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी त्यांना उपचारासाठी पानीपतमधील पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हृदयात स्टेंट टाकल्याचा आरोप
कुटुंबीयांचा आरोप आहे की, २५ जुलै रोजी डॉक्टरांनी त्यांना न सांगता आणि लेखी संमती न घेता महिलेच्या हृदयात स्टेंट टाकले. आरोप असाही आहे की परवानगी पत्रावर बनावट सही केली गेली. स्टेंट टाकल्यानंतर महिलेची तब्येत बिघडली आणि उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, घटनेनंतर रुग्णालय प्रशासन त्यांच्यावर कारवाई न करण्याचा दबावही आणत होते.