आता फक्त पंढरीची ओढ! वाखरीत संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची लगबग
आता फक्त पंढरीची ओढ! वाखरीत संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची लगबग
img
Nandini khandare More
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता पंढरपूरकडे लागले आहे. संतांच्या मानाच्या पालख्या आज पंढरपूर तालुक्यात दाखल होणार असून, वाखरी येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांची व्यापक तयारी केली आहे.

वारीचा अंतिम मुक्काम असलेल्या वाखरीला वारकरी परंपरेत विशेष महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या येथे एकत्र येतात आणि त्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे वाखरी परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाखरी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने पाणी उपसून रस्त्यांचे सपाटीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वाखरी येथे लाखो वारकरी मुक्काम करणार असल्याने सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीपूर्वी वाखरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विठ्ठलनामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group