पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. अशा वेळी डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील पहिल्या डेंग्यू लसीला CDSCO कडून मंजुरी मिळाली असून, 'क्यूडेंगा' ही लस ठराविक वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
‘क्यूडेंगा’ ही लस जपानच्या टाकेडा कंपनीने तयार केली असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तिचे उत्पादन भारतातच होणार आहे. यासाठी टाकेडाने हैदराबादमधील बायोलॉजिकल ई कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे देशात लसीचा पुरवठा अधिक वेगाने आणि सुलभपणे होण्याची अपेक्षा आहे.
एका आठवड्यात दिसेल जादू डेंग्यूचे चार वेगवेगळे प्रकार (स्ट्रेन) असतात. क्यूडेंगा ही टेट्राव्हॅलेंट लस असल्याने ती या चारही प्रकारांपासून लागण होण्यापासून संरक्षण करते विशेष म्हणजे, यापूर्वी काही डेंग्यू लसी फक्त आधी डेंग्यू झालेल्या व्यक्तींनाच दिल्या जात होत्या. मात्र क्यूडेंगा लस डेंग्यूचा पूर्वीचा संसर्ग नसलेल्या व्यक्तींनाही देता येते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये या लसीमुळे ९० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळले आहे. तसेच डेंग्यूची गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.
CDSCO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ४ वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना ही लस देता येणार आहे. या लसीचे दोन डोस दिले जातील. पहिल्या डोसनंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस दिला जाईल. तज्ज्ञांच्या मते, लस ही डेंग्यूपासून संरक्षणाची ढाल आहे. मात्र घराजवळ पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि स्वच्छता राखणे हे उपाय तितकेच महत्त्वाचे राहणार आहेत.