२०२० मध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. ३ वर्ष हाहाकार माजवलेल्या या महामारीने पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. विशेषतः पुणे शहरात गेल्या दहा दिवसांत कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, सध्या आढळणारे बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांचे असल्याने आणि गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नसल्याने तज्ज्ञांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत किती रुग्ण? राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड-१९ चे ४८रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या काळात कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेली जवळपास तीन वर्षे कोविडचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, यावर्षी जानेवारीपासून रुग्णसंख्येत हळूहळू वाढ दिसून येत आहे. जानेवारीमध्ये ३, फेब्रुवारीमध्ये १, जूनमध्ये ११ आणि जुलै महिन्यात आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, बहुतांश रुग्ण नियमित कोविड चाचण्यांमधून समोर आलेले नाहीत. इतर आजारांवरील उपचारादरम्यान किंवा शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.
डॉक्टरांनी काय सांगितलं? पुण्यातील जहांगीर रुग्णालयातील डॉ. पीयूष चौधरी यांनी सांगितले की, २०२३ नंतर प्रथमच कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत कोविडबरोबरच इन्फ्लूएंझा रुग्णांचीदेखील संख्या वाढली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ एका रुग्णालयातच काही दिवसांत ७ ते ८ कोविड रुग्ण आढळले आहेत.