सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. अन्न आणि औषध विभागाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA च्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक ठिकाणी धाडी टाकून विविध हॉटेल्सवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अशातच आता मुंबईतही अन्न आणि औषध विभागाने धडक कारवाई केली आहे.
मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील शतकभर जुने आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर एफडीएने कारवाई करत संस्थेचा परवाना निलंबित केला आहे.
बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानले जाते. मात्र, तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे FDA ने ही कारवाई केली. यापूर्वीही FDA ने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवरही निलंबनाची कारवाई केली होती.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याने मुंबईतील PARSI DAIRY FARM PVT. LTD., प्रिन्सेस स्ट्रीट, मरीन लाईन्स, कालबादेवी येथील आस्थापनेवर केलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा व स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित आस्थापनेचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. दिनांक 14 जुलै 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी नियम, 2011 मधील विविध तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न), परिमंडळ-1 यांनी दिनांक 15 जुलै 2026 रोजी परवाना निलंबनाचा आदेश जारी केला.
पारसी डेअरी फार्मच्या दुकानात काय काय सापडलं?
तपासणीदरम्यान आढळलेल्या प्रमुख त्रुटींमध्ये कच्च्या दुधाच्या स्वीकारासाठी संरक्षित Raw Milk Reception Dock नसणे, साठवण कक्ष व उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ, कच्चा माल थेट जमिनीवर साठविणे, बुरशीग्रस्त भिंतीलगत कच्चा माल ठेवणे, उत्पादन विभागात अस्वच्छता, माशांचा मोठ्या प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (ETP) नसणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणे, योग्य सुरक्षात्मक पादत्राणे उपलब्ध नसणे, वाहन स्वच्छतेच्या नोंदी उपलब्ध नसणे तसेच अनेक अन्नपदार्थांवर 'Best Before/Use By/Date of Expiry' यांसारखी अनिवार्य माहिती नसणे अशा गंभीर बाबींचा समावेश आहे.
पारसी डेअरी फार्मचा परवाना रद्द-
सदर त्रुटींमुळे अन्नाचे सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण होण्याचा तसेच ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे व्यापक जनहित व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा परवाना क्रमांक 11517001000254 हा 15 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. निलंबन कालावधीत संबंधित आस्थापनेला अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.