पाणीपुरी आणि पावभाजी म्हंटल कि साऱ्या खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. लहान्यांपासून मोठ्यांपर्यत , तरुण असो व वृद्ध, भारतात पाणीपुरी आणि पावभाजी लवर मोठ्या प्रमाणत आहेत. वीकेंड असो किंवा धावपळीचा दिवस पण हे खवय्ये हा आवडीचा पदार्थ आवर्जून खाताना दिसतात. पण याच पदार्थांचा रेट जर पाणीपुरी 830 रुपये तर पावभाजी 1270 रु असा असेल तर ? होय कारण यापदार्थांचे असे रेट आहेत. पण ते कुठे ते जाणून घेऊ.
भारतातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह खाद्य ब्रँड Haldiram’s ने आता लंडनमध्येही आपलं नवीन आउटलेट सुरू केलं आहे. या नव्या रेस्टॉरंटबाहेर ग्राहकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या आउटलेटपेक्षा सध्या अधिक चर्चा होत्ये ती तेथील खाद्यपदार्थांच्या किंमतींची… भारतात आपण ज्या पाणीपुरीच्या एका प्लेटसाठी साधारण 30 ते 50 किंवा जास्तीत जास्त 75 रुपये मोजतो, त्याच पाणीपुरीची किंमत लंडनमधील Haldiram’s मध्ये £6.50 म्हणजेच सुमारे 830 रुपये आहे. त्यामुळे या किमती ऐकून भीारतीय ग्राहकांना फारच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे,
एवढंच नव्हे तर पावभाजीची किंमतही ओव्हर द टॉप आहे. लंडनच्या आऊटलेटमध्ये एक प्लेट पावभाजी ही £9.90 सुमारे ₹1,270 रुपयांना मिळते तर तर गार्लिक नानची किंमत £5 सुमार 640 रुपये आहे. म्हणजेच, भारतातील तुलनेत लंडनमधील Haldiram’s मधील अनेक पदार्थांच्या किंमती जवळपास सातपट अधिक आहेत.
लंडनमध्ये खाद्यपदार्थ महाग का?
तज्ज्ञांच्या मते, लंडनसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात रेस्टॉरंट चालवण्याचा खर्च भारताच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जास्त असतो. जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, आयात शुल्क, कर आणि कच्च्या मालाचा खर्च यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमती वाढतात.याशिवाय, Haldiram’s ने लंडनमध्ये स्वतःला भारतातील परवडणाऱ्या कौटुंबिक रेस्टॉरंटऐवजी प्रीमियम इंडियन कॅज्युअल डाइनिंग ब्रँड म्हणून सादर करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे तेथील मेन्यू आणि किंमत धोरण भारतातील आउटलेट्सपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे.
लंडनमधील Haldiram’s चा मेन्यू भारताच्या तुलनेत छोटा आणि निवडक पदार्थांचा आहे. प्रत्येक पदार्थासोबत त्याचे सविस्तर वर्णन देण्यात आले आहे, जेणेकरून भारतीय खाद्यपदार्थांशी परिचित नसलेल्या परदेशी ग्राहकांना ते समजण्यास सोपे जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमधील लेस्टर स्क्वेअर येथे सुरू करण्यात आलेल्या या रेस्टॉरंटमध्ये सुमारे 110 ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. Haldiram’s च्या या आंतरराष्ट्रीय विस्तारामागे कुटुंबातील 24 वर्षीय रिया अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. रिया यांनी जवळपास 11 वर्षे लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. ब्रिटनमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन Haldiram’s ला तेथे एक मोठा ब्रँड बनवण्याची संधी असल्याचं त्यांना वाटलं.
लंडनमधील दुकानात मिळणाऱ्या ‘हलदीराम’च्या खाद्यपदार्थांचे दर हे भारताची राजधानी दिल्लीच्या तुलनेत जवळपास सातपट, अधिक आहेत. शिवाय, परदेशी नागरिकांना भारतीय खाद्यपदार्थांची अधिक चांगली ओळख करून देण्यासाठी तिथला मेनू (खाद्यपदार्थांची यादी) बऱ्यापैकी संक्षिप्त ठेवण्यात आला असून, प्रत्येक पदार्थासोबत त्यांचे सविस्तर वर्णनही दिलं आहे