येती जाती कार्यक्रमावेळी जळगावातील एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैशाली भाऊसाहेब पाटील असं मृत नवविवाहितेचे नाव आहे. वैशाली पाटील हिचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील देवरामनगर येथील पोलिस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी झाला होता. जंगी लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर नवरा नवरीचं देवदेवाचा कार्यक्रम देखील झाला. घरी पुजा झाली अन् मुलीच्या येती जातीचा कार्यक्रम करायचं ठरलं. मुलाकडेच्या लोकांनी मुलीकडच्यांना नवरीला काही दिवस घेऊन जा, असं सांगितलं. त्यासाठी तिच्या काकांनी पुढाकार घेतला. सोमवारी वैशालीला माहेरी नेण्यासाठी तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील जळगावात आले होते. पण घडलं भलतंच.
वैशालीचा जीव वाचवता आला नाही
दुपारी जेवण आटोपल्यानंतर काका आणि नवविवाहित वैशाली दुचाकीने कोळपिंप्रीकडे जात असताना मोठी दुर्घटना घडली. दुचाकीने माहेरी जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अन् या अपघातात वैशालीचा मृत्यू झाला. तर काकांना देखील चांगला मार बसला आहे. काकांचा जीव वाचला असता तरी वैशालीचा जीव वाचवता आला नाही. अमावास्या येत असल्याने नातेवाइकांनी काकांना दुचाकीऐवजी एसटी बसने जाण्याचा सल्ला दिला होता. पण काका गाडीवर निघून गेले होते.