महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाने (ATS) राज्यभर मोठी समन्वित कारवाई करत अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगरा गँगशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून ही मोहीम राबविण्यात आली असून, तपास यंत्रणांनी विविध ठिकाणी संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
या व्यापक कारवाईदरम्यान ATSने राज्यातील विविध भागांतून 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या छापेमारीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली असून, या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एटीएसने बुधवारी सकाळी 8 वाजता मुंबई, पुणे, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या प्रमुख शहरांत छापे टाकले. पाकिस्तानी गँगस्टरने भारतात तयार केलेले नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एटीएसने छापा टाकला. ताब्यात घेतलेले 100 हून अधिक जण हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानातील गुन्हेगारांच्या संपर्कात होते, असा संशय आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर हे सोशल मीडियाचा वापर करून भारतातील काही तरुणांच्या संपर्कात होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गँगस्टरकडून बेरोजगार तरुणांना लझ्जरी लाइफस्टाइल आणि पैशांचं आमिष दाखवून गुन्हेगारी जाळ्यात अडकवले जात आहे. या एटीएसच्या कारवाईचा उद्देश हा स्लीपर सेल, गुन्हेगार, पाकिस्तानी नेटवर्कशी संबंधित लोकांना टार्गेट करण्यासाठी होता. या गँगस्टरच्या नेटवर्कशी संबधित तरुणांकडून गुन्हेगारी कट आणि शस्त्र तस्करी केली जात असून ती हाणून पाडण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
एटीएसने छाप्यादरम्यान संशयिताकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. आता एटीएसकडून संशयिताची बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान किंवा इतर देशांमधून फंड पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहे शहजाद भट्टी?
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहणारा शहजाद भट्टी हा मागील काही महिन्यांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. 45 वर्षीय भट्टी याच्या विरोधात भारतातील दहशतवादी नेटवर्क वाढवणे, हेरगिरीशी संबंधित डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. भट्टी हा सध्या दुबईतून नेटवर्क चालवत आहे. तो पाकिस्तान आणि आशियातील काही देशांत वारंवर प्रवास करत असतो. त्याने मार्च 2024 मध्ये जालंधरमध्ये युट्युबर रॉजर संधूच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्याच्यावर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार झीशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप आहे.