नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मुलाला क्लर्क म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फसवणुकीचा प्रकार विद्यापीठात काम करणार्या अनंत सोनवणे याने केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्यासाठी सन 2017 पासून धडपड करीत होत्या. पीडितेच्या मुलाचा मानलेला भाऊ याच्या माध्यमातून सन 2022 मध्ये जेलरोड येथील रहिवासी देवीदास ढोमसे याच्याशी पीडितेच्या मुलाशी ओळख झाली. देवीदासने मुलाला नोकरी लावून देतो, असे सांगून दोन दिवसांत नाशिकरोड कोर्टाजवळ असलेल्या कपालेश्वर हॉटेलमध्ये विनोद दिवे नावाच्या इसमाशी ओळख करून दिली. पुढील दोन-तीन दिवसांत विनोद दिवे याने आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीस असलेल्या अनंत काशीनाथ सोनवणे याची ओळख करून दिली. सोनवणे याने पीडितेच्या मुलाला आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे सांगत त्यासाठी दहा लाख रुपये लागतील, असे पीडितेच्या मुलाला सांगितले.
त्यानुसार जुलै 2023 मध्ये सोनवणे याने नोकरीची प्रोसेस करण्यासाठी तीन लाख रुपये लागतील व उर्वरित सात लाख रुपये टप्प्याटप्प्याने लागतील, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलाच्या नोकरीसाठी फिर्यादी महिलेने बेअरर चेकद्वारे सोनवणे याला तीन लाख रुपये दिले. नंतर दि. 20 डिसेंबर 2023 रोजी तीन लाख रुपये रोख व दि. 17 मार्च 2024 रोजी दोन लाख रुपये रोख अनंत सोनवणे याला विद्यापीठाच्या आवारात दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांनी फिर्यादी महिलेने नोकरीबाबत विचारणा केली असता प्रोसेस सुरू आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे सोनवणे देऊ लागला. नंतर तो टाळाटाळ करू लागला. फिर्यादी महिलेला शंका आल्याने त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठात जाऊन क्लार्क पदाची भरती सुरू आहे का, याची खात्री केली. तेव्हा अशी कोणतीच भरती विद्यापीठामार्फत सुरू नसल्याचे फिर्यादीला समजले. त्यामुळे त्यांनी अनंत सोनवणे याची तक्रार विद्यापीठात केली. विद्यापीठाच्या चौकशीत सोनवणेने पैसे घेतल्याची कबुली दिली. चौकशी सुरू असता सोनवणे याने आठ लाख रुपयांचा चेक विनोद दिवे व देवीदास ढोमसे यांच्यामार्फत पाठविला.
दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादीला आठ लाख रुपये खात्यात क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. त्याच दिवशी खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे फिर्यादी सोनवणे याला भेटण्यासाठी सांगत होते. एप्रिल 2026 मध्ये फिर्यादीने पुन्हा विनोद दिवे व देवीदास ढोमसे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता दोन महिन्यात देतो, असे सांगितले. दोन महिन्यांनंतर या दोघांनी फिर्यादीला गलिच्छ शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तिघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.