नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असलेलं पात्र साकारत असल्याची चर्चा आहे. दरम्यान आता या चित्रपटावरून रुपाली चाकणकर चांगल्याच भडकल्या असल्याची माहिती आहे.
या चित्रपटात आपली परवानगी न घेता आपली व्यक्तिरेखा दाखवली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तसेच रुपाली चाकणकर म्हणाल्या,हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर सिनेमा बनवता येत नाहीय. सिनेमा बनवला तरी जिवंत व्यक्तीवर आधारित चित्रपट किंवा पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची लेखी परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक असतं. या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळं दोन दिवसांत चित्रपट निर्माते आणि संबंधित कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. असा इशारा चाकरणकरांनी दिलाय.
तसेच, माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, खरात प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वाट्टेल तसे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. माझी मुलं सध्या शैक्षणिक क्षेत्रात करिअर करत आहेत, असं असतानाही त्यांना नाहक टार्गेट करण्यात आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. असंही चाकणकर यांनी म्हटलं.
रुपाली चाकणकर यांनी केवळ चित्रपट निर्मात्यांवरच नाही, तर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणाऱ्यांवरही कायदेशीर बडगा उगारला आहे. त्यांनी सांगितलं की, पुराव्याशिवाय चिखलफेक करणाऱ्या आशा मिरगे, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यासह काही यूट्यूब चॅनेल्सनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
"येत्या १० जुलै रोजी मी स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी हजर राहणार आहे. स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी हा कायदेशीर लढा मी शेवटपर्यंत लढणार आहे," असे चाकणकर यांनी ठामपणे सांगितले.