नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथे महावितरणच्या विद्युत रोहित्रावर काम करताना विजेचा धक्का लागून तंत्रज्ञ जय सकट यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर महावितरणने प्रशासकीय कारवाई करत त्यांच्या सहकारी तंत्रज्ञ राजेश चौरे यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास नारायण बापूनगर (आढाव मळा) परिसरातील विद्युत रोहित्रावर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना जय सकट यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत काम करणारे तंत्रज्ञ राजेश चौरे यांनाही या घटनेचा मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक चौकशीत दोन्ही तंत्रज्ञांनी कामादरम्यान आवश्यक विद्युत सुरक्षा साधनांचा वापर न केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. विशेषतः इन्सुलेटेड हातमोजे, डिस्चार्ज रॉड व डीओ (DO) रॉड यांसारखी सुरक्षा उपकरणे वापरण्यात आली नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, सहकारी तंत्रज्ञ म्हणून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत महावितरणचे शहर-२ विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश जाधव यांनी राजेश चौरे यांना निलंबित केल्याचे समजते.
काम सुरू करण्यापूर्वी आणि कामादरम्यान निर्धारित सुरक्षा उपकरणांचा वापर झाला असता, तर ही दुर्दैवी दुर्घटना टाळणे शक्य झाले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रक्रियेचे अधिक काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.