टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या अनेकदा चर्चेचा विषय असतो. कधी त्याचा खेळ असेल किंवा त्याचं खाजगी आयुष्य असो यामुळे तो नेहमी प्रकाश झोतात असतो. दरम्यान आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या याने घेतलेल्या निर्णयाने चर्चा सुरु झाली आहे. हार्दिक पांड्याने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्या मूळचा बडोद्याचा आहे, पण मागच्या काही वर्षांपासून तो मुंबईमध्येच राहत आहे.
हार्दिक पांड्या हा मुंबईमध्ये मुंबई इंडियन्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करायचा. तसंच तो मुंबईच्या लोअर परळ भागात राहायचा, पण आता हार्दिक मुंबई सोडत आहे. हार्दिक पांड्यासाठी हा निर्णय फक्त शहर बदलण्याचा निर्णय नाही, तर दुखापतींमुळे हार्दिक पांड्या त्याच्या क्रिकेट करिअरची पूर्ण रणनीती बदलत आहे.
हार्दिक पांड्या मागच्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू आहे, पण अनेकदा मोक्याच्या क्षणी हार्दिकला होत असलेल्या दुखापती टीम इंडिया आणि बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला.
सततच्या दुखापतींमुळे हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरची उरलेली वर्ष पूर्णपणे फिटनेसच्या हिशोबाने प्लान करण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे हार्दिक मुंबईसोडून बंगळुरूला शिफ्ट होत आहे.हार्दिक पांड्या जेव्हा टीम इंडियासोबत तसंच आयपीएल किंवा स्थानिक क्रिकेट खेळत नसेल तेव्हा तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असेल.
मुंबईतल्या घरातून रोज ट्रेनिंगसाठी लांब प्रवास करणं हार्दिक पांड्यासाठी कठीण झालं होतं. दुसरीकडे बंगळुरूमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, तिथेच त्याला मेडिकल, रिकव्हरी, फिटनेस आणि स्किल ट्रेनिंगच्या सुविधाही उपलब्ध आहेत, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.
बीसीसीआयने करारबद्ध केलेले खेळाडू आतापर्यंत गरज पडली तर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जायचे. दुखापत झाली तर रिहॅब, फिटनेस टेस्टसाठी किंवा टीमच्या कॅम्पसाठी खेळाडू इथे यायचे, पण हार्दिक ही परंपरा बदलणार आहे.
हार्दिक पांड्याला आणखी पाच ते सहा वर्ष व्हाईट बॉल क्रिकेट खेळायचं आहे, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिक सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याचा वैयक्तिक फिजियो, स्ट्रेन्थ ऍण्ड कंडिशनिंग कोचसोबत राहिल. तसंच बीसीसीआयच्या मेडिकल टीमचंही त्याच्यावर लक्ष असेल.
32 वर्षांचा हार्दिक पांड्या सध्या क्वाड्रिसेप्स इंज्युरीतून बरा होत आहे. या दुखापतीमुळे हार्दिक टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध 3 टी-20 खेळणार आहे, या सीरिजमध्ये हार्दिक खेळणार का? याबाबतही सस्पेन्स आहे.