शेतात काम करताना साप चावण्याच्या घटना अनेकदा जीवघेण्या ठरतात. मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने हा धोका कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. शेतात साप असल्यास थेट मोबाईलवर अलर्ट पाठवणारे एक नवे अॅप विकसित करण्यात आले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत सावध होऊन योग्य खबरदारी घेता येणार आहे. हे अॅप नेमके कसे काम करते आणि त्याचा फायदा कसा होणार, जाणून घ्या.
पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नदी नाल्यांना येणारा पुरासह साप निघणं देखील एक मोठी चिंतेची बाब ठरत असते. दरवर्षी देशभरात हजारो लोक सर्पदंशाला बळी पडतात आणि त्यामध्ये शेतकरी व ग्रामीण भागातील रहिवाशांची संख्या मोठी असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक मोबाइल ॲप मदत करणार आहे. जे शेतकऱ्यांना सापांपासूनच्या धोक्यांबाबत आगाऊ सूचना देऊ शकते. शिवाय, सापाचा दंश झाल्यास, उपचार आणि मदत मिळवून देण्यात हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावते.
हे ॲप काय आहे? SERPENT (Snake Emergency Response Programme & Response Tool). हे एक मोबाईल ॲप आहे, जे सापविषयक आणीबाणीच्या प्रसंगी आणि साप चावण्याच्या घटनांच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे ॲप सापांची ओळख, साप चावण्यापासून बचाव, जवळची रुग्णालये आणि प्रशिक्षित सर्पमित्र यांविषयीची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देते. हे सर्वसामान्य जनतेसोबतच शेतकरी, वनक्षेत्रात काम करणारे आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त मानले जाते.
घरात साप असेल तर मिळेल अलर्ट शेत, गाव आणि जंगलालगतच्या परिसरामध्ये साप आढळण्याची शक्यता अधिक असते. ॲपवरील स्थानविषयक माहिती आणि अहवाल शेतकऱ्यांना सापांचे दर्शन घडलेल्या जवळच्या ठिकाणांची ओळख पटवण्यास मदत करतात. यामुळे शेतात काम करण्यापूर्वी अधिक खबरदारी घेणे शक्य होते. तसेच धोका कमी करण्यास मदत मिळते. मात्र, हे ॲप प्रत्येक सापाच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत सूचना देत नाही; त्याऐवजी, ते साप आढळल्याच्या नोंदी आणि उच्च-धोक्याच्या क्षेत्रांविषयी माहिती पुरवते.