(PF) खात्याशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ते आजच पूर्ण करून घ्या. कारण उद्या काही तासांसाठी पीएफच्या ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत बॅलन्स तपासणे, क्लेम दाखल करणे, केवायसी अपडेट करणे किंवा इतर ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसण्याची शक्यता असून, त्यामुळे खातेदारांना गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कामे आगाऊ पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ईपीएफओने त्यांच्या कोट्यवधी सदस्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. सब्सक्राईबर्ससाठी त्यांनी अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार, उद्या 5 ऑगस्ट 2026 रोजी ई-ऑफिस ॲप्लीकेशन (e-Office application) सेवा काही काळ बंद असेल. याचा अर्थ या कालावधीत युझर्स, कर्मचारी कोणत्याही सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. काय आहेत याविषयीची अपडेट?
ईपीएफओने 3 ऑगस्ट 2026 रोजी याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. बुधवारी, 5 ऑगस्ट 2026 रोजी ई-ऑफिस सेवा पूर्णपणे ठप्प होतील. संध्याकाळी 6:00 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत सर्व सेवा बंद असतील. या साडेतीन तासात युझर्स ई-ऑफिस ॲपचा वापर करू शकणार नाहीत. ईपीएफओविषयी एखादा अर्जफाटा करायचा असेल तर अगोदर करा अथवा नाहक त्रागा करून घेण्यापेक्षा नंतर हे काम करा.
सिस्टिम अपग्रेडशी संबंधित तांत्रिक कारण
अचानक ही सेवा बंद का करण्यात येत आहे याविषयीचा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ईपीएफओने त्यांची डिजिटल सेवा अत्याधुनिक करण्यासाठी अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. त्यासाठीच हा तीन ते साडेतीन तासांच्या कालावधीत सर्व कामे बंद असतील. या कालावधीत सिस्टिम अपग्रेडेशन करण्यात येईल. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरची (NIC) ई-ऑफिस टीम या कालावधीत या प्लॅटफॉर्मवरील अनेक सेवा अपडेट करणार आहे. या प्रक्रियेत ई-फाईल, पोर्टल, एमआईएस (MIS) आणि एमडीएम (MDM) नवीन व्हर्जन इन्स्टॉल करण्यात येतील. या सुधारणेनंतर ही सेवा अधिक सुरक्षित, गतिमान होईल.
पीएफ क्लेम मंजूरीसाठी लागू शकतो वेळ
जूनच्या अखेरीस ईपीएफओने कर्मचारी पोर्टल आणि उमंग ॲपमध्ये डेटाबेस हलवला होता. ईपीएफओने आता महत्त्वाचे सॉफ्टवेअर अपग्रेडचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. नवीन व्यवस्थेत ते हळूहळू लाईव्ह करण्यात येत आहे. ईपीएफओने स्पष्ट केले आहे की सिस्टिम मायग्रेशननंतर क्लेम आणि सर्व्हिस रिक्वेस्टसाठी थोडा वेळ लागू शकतो. कोणतीही चूक होऊ नये यासाठी वेळ लागणार आहे. या काळात पोर्टलवर वारंवार लॉगिन करू नका असे आवाहन ईपीएफओने केले आहे. त्याचवेळी उमंग ॲपमध्ये काही अर्ज करू शकता, पण येथेही सदस्यांना सेवांसाठी काही काळ वाट पहावी लागू शकते.