देशात कोट्यवधी व्यापारी वर्गासह सामान्य जनता UPI व्यवहारांचा वापर करत असून आता मात्र सरकरने UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याने व्यापाऱ्यांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. दरम्यान, आता UPI पेमेंटच्या शुल्कावरून व्यापारी आक्रमक झालायचे दिसत आहेत.
UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4 टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयाला उल्हासनगर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या शुल्कामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांचेही नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काही व्यापाऱ्यांनी दुकानांवरील UPI पेमेंटचे फलक आणि QR कोड हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा रोखीने व्यवहार करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, वस्तूंच्या विक्रीवर आधीच GST भरला जात असताना UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लावणे हा आणखी आर्थिक भार ठरेल.
दररोज कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर शॉपकीपर असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हे शुल्क मागे घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान नागपुरातील चितारओळी परिसरात UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या मागणीविरोधात काँग्रेसच्या व्यापारी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. UPI वरील शुल्काचा प्रस्ताव मागे घ्या, अशी जोरदार मागणी करत कार्यकर्त्यांनी परिसरात घोषणाबाजी केली.