राज्यात पुन्हा एकदामराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. दरम्यान, काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. बीपी आणि शुगर कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थ असतानाही उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
जरांगे पाटील सध्या बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या पुढील दौऱ्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सहकाऱ्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीसह पुढील आंदोलन आणि मुंबईकडे जाण्याच्या नियोजनावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. बीपी आणि शुगर कमी झाल्याने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात असले, तरी जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.