गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गणरायाच्या आगमनासोबतच वरून राजानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. दरम्यान आता शनिवारपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवासाला सुरूवात होईल. पण अद्याप महाराष्ट्रातील अनेक तालुक्यात विदारक स्थिती असून दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. दरवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २ दिवस राज्यातील अनेक भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढील चार दिवसही राज्यात पावसाची उघडीप होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर गुरुवारी, शुक्रवार आणि शनिवारी अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मात्र या सरी सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात उघडीप राहण्याचा अंदाज आहे
देशात शनिवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थात मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. खान्देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या या पावसामुळे स्थानिक नद्या, नाले आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे काही भागांतील पिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसामुळे खान्देशातील लहान-मोठे प्रकल्प आणि बंधारे भरू लागले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि विहिरींच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कपाशी, तांदूळ, मका आणि केळी यांसारख्या मुख्य पिकांना या पावसाचा मोठा फायदा झाला आहे. मात्र, ज्या भागात पाणी साचून राहिले आहे, तिथे पिके पिवळी पडण्याचा धोका वाढला आहे. सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या काही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आता पाऊस उघाडण्याची वाट पाहत आहेत.