स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार ; धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश
स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार ; धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश
img
Nandini khandare More
स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरु असल्याचा धक्कदायक प्रकार  उघडकीस आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं उघडकीस आलेलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा नांदेडमधून असा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार , नांदेडमधून शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून नेपाळसह विविध राज्यांतील सात महिलांची सुटका केली असून, या प्रकरणात तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रकरणाची खात्री करण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून स्पा सेंटरमध्ये पाठवले. यावेळी संबंधित बनावट ग्राहकाकडून चार हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्याने पोलिस पथकाला ठरल्याप्रमाणे इशारा दिला.

इशारा मिळताच LCBच्या पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये सात महिला आढळून आल्या. या महिलांपैकी काही महिला नेपाळ, नागालँड आणि नवी दिल्ली येथील असून, तसेच ठाणे आणि पुणे येथूनही महिला आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या सातही महिलांची सुटका केली आहे. छाप्यावेळी स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर आसाम येथील हीफझुल रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा मात्र पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच फरार झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, फरार मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत. स्पा सेंटरमध्ये नेमका किती काळापासून हा प्रकार सुरू होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. नांदेड शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group