राज्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला मात्र आता या उत्सावाला पिंपरी-चिंचवडमध्ये याच डीजेने एका महिलेचा बळी घेतला आहे. डीजे अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात ही घटना घडली. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. ऐन उत्सवात महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी डीजेचा रॅक उभारण्यात येत होता. हा रॅक अचानक कोसळला. यामधील डीजे एका महिलेच्या अंगावर पडला. डीजे अंगावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
दहीहंडीच्या आयोजनकांनी वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका यांची परवानगी घेतली होती का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दहिहंडीच्या आयोजनक आणि डीजे मालकाविरोधात पोलिस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे राहिल. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.