एका गर्भवतीच्या पित्तनलिकेतून चक्क १५ खडे निघाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहूनही धक्कादायक बाबा अशी की ही महिला २० आठवड्यांची गर्भवती आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की , गर्भावस्थेत होणारी पोटदुखी आणि उलट्या हा नेहमीचा त्रास असेल असं समजणं २७ वर्षीय महिलेला महागात पडलं असतं. काही दिवसांनी त्यांना ताप आला आणि डोळेही पिवळे झाले. तपासणी केल्यानंतर त्यांच्या पित्तनलिकेत अनेक खडे अडकून संसर्ग झाल्याचे समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी त्या २० आठवड्यांच्या गर्भवती होत्या.
नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. गर्भाला होणारा एक्स-रेचा धोका कमीत कमी ठेवत डॉक्टरांनी ERCP ही प्रक्रिया केली. या प्रक्रियेत पित्तनलिकेत अडकलेले ७ ते ८ मिमी आकाराचे तब्बल १५ खडे काढण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण झाली.
या महिलेची ही पहिलीच गर्भधारणा होती. सुरुवातीला पोटदुखी आणि उलट्या गर्भावस्थेमुळे होत असाव्यात, असं त्यांना वाटलं. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचारही घेतले. मात्र उपचारांनंतरही त्रास वाढत गेला. त्यानंतर डोळे पिवळे होणं, ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.