रविवारी दिल्लीत एक इमारत कोसळून मोठी दुर्दैवी घटना घडली दरम्यान आत याप्रकरणी मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील ५० वर्षे जुनी इमारत कोसळल्यानंतर या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने दक्षिण विभागाच्या उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, दुर्घटनेनंतर गायब झालेल्या इमारतीच्या मालकाला पोलिसांनी राजस्थानमधील भिवाडी येथून अटक केली आहे. या दुर्घटनेमध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू असून या प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
उपायुक्त राकेश कुमार, अधीक्षक अभियंता रणवीर सिंग, कार्यकारी अभियंता ललित कुमार गोयल, सहायक अभियंता सुनील चौहान, कनिष्ठ अभियंता आशिष कुमार या ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोध आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सत्य निकेतन याठिकाणी इमारत दुर्घटनेच्या ठिकाणी भेट दिली. त्यांच्यासोबत दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी आले होते. दिल्ली सरकारने रविवारी इमारत कोसळण्याच्या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आणि या घटनेची जबाबदार आढळलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रेखा गुप्ता यांनी जवळपासच्या पेइंग गेस्ट निवासस्थानांची आणि इमारतींची सखोल तपासणी करण्याचे देखील आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर कोणत्याही इमारती सील केल्या जातील.