कॉकरोच जनता पार्टीने येत्या 5 सप्टेंबर 2026 दिल्लीत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र आज मोर्चा मागे घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात माहिती दिली आहे. नीट परीक्षा पेपर फुटीनंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं. सरकारी यंत्रणेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर या प्रकरणात अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने उडी घेतली. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी जतंर मंतरवर तब्बल एक महिन्यापेक्षा अधिककाळ आंदोलन सुरू होतं. संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 25 जुलैरोजी हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. यावेळी सरकारच्या वतीने आंदोलकांना काही आश्वासनं देखील देण्यात आले होते. मात्र अजूनही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा एकदा पाच सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन रद्द करण्यात आलं आहे.