नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत असून य महाप्रलयाने विद्धवंसं केला असून हाहाकार माजला आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत ६१६ जणांचा बळी घेतला आहे. तर २५०० पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. पूरामध्ये वाहून गेलेल्यांमध्ये सैन्य, पोलिस आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे नेपाळमध्ये गेलेले ३२० भारतीय देखील बेपत्ता आहे. या सर्वांशी संपर्क करण्याचा भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. काही भारतीय नागरिकांशी संपर्क झाला असून त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे, तिबेटमध्ये अडकलेल्या ४०० भारतीयांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. महापूराचा फटका बसलेल्या भागामध्ये सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परिस्थिती सतत गंभीर होत असून पूराचे पाणी वाढत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. भोटेकोशी नदीजवळ पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागल्यामुळे दुसऱ्यांदा पूर येण्याचा धोका वाढला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.
प्राथमिक तपासानुसार, एक हिमनदी फुटली आणि बर्फ, खडक आणि मातीचा ढिगारा खाली कोसळला. हा ढिगारा लेंडी नदीत पडल्याने तिचा प्रवाह तात्पुरता थांबला. जेव्हा हा नैसर्गिक अडथळा तुटला तेव्हा पाण्यासोबत चिखल, खडक आणि ढिगाऱ्यांचा एक प्रचंड प्रवाह नदीच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून गेला. या परिणामामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या काठावरील गावांचे मोठे नुकसान झाले ज्यामुळे अनेक वस्त्या, रस्ते, पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त झाले.
नेपाळमध्ये आलेल्या महापुरांनंतरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे बेपत्ता झालेल्यांना शोधून काढणे. डोंगराळ भागातील अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या प्रमणात अडचणी येत आहेत. या आपत्तीमुळे ९०,००० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरं वाहून गेल्यामुळे राहण्याचे हाल होत आहेत. पुराचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवरही झाला आहे. १३ जलविद्युत प्रकल्पांमधील अंदाजे ९३३ कामगार बेपत्ता झाल्याचे वृत्त होते, त्यापैकी २५४ जणांना वाचवण्यात आले आहे. इतर अनेक जण बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती आहे. एकट्या अप्पर त्रिशुली-१ प्रकल्पातील ५७६ कामगार अजूनही बेपत्ता आहेत.
नदीच्या मार्गात तयार झालेल्या तात्पुरत्या तलावामुळे निर्माण झालेला धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. सध्या नदीची पाणी पातळी सामान्य असली तरी देखील पाण्याच्या स्थितीवर आणि त्यावर साचलेल्या कचऱ्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम फक्त नेपाळवर झाला नाही तर सीमेपलीकडे चीनच्या तिबेटमध्येही झाला आहे. तिबेटमध्ये महापूराने हाहाकार माजवला. ग्यिरोंग काउंटीमधील पुरात ५ जणांचा मृत्यू झाला, तर २६० परदेशी नागरिकांसह अंदाजे ५५८ जण बेपत्ता आहेत. खवळलेल्या पाण्यामुळे गावे, वीज प्रकल्प, रस्ते, पूल आणि दळणवळण यंत्रणा यांचे नुकसान झाले.