संतापजनक ! आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग; एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
संतापजनक ! आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग; एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
img
Nandini khandare More
सध्या महिला सुरक्षेच्या प्रश्नासह आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एका आश्रमशाळेत  21 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूरयेथील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ,  टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच वेळी तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत झिपरू गवळी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच इमारतीत हे वसतीगृह चालवले जाते. दुसऱ्या मजल्यावर मुले आणि तिसऱ्या मजल्यावर मुली राहतात. कपडे धुण्यासाठी आणि जेवणासाठी मुलींना वारंवार खाली यावे लागते. याच गोष्टीचा गैरफायदा आरोपी गणपत गवळी घेत होता.

मुली जेवणाचे ताट धुण्यासाठी आल्या की हा आरोपी त्यांच्या हाताला, पाठीला आणि इतर ठिकाणी विनाकारण स्पर्श करायचा. इतकेच नाही, तर १०वीत शिकणाऱ्या एका पीडित मुलीला त्याने एकटे गाठून तिच्यावर थेट अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीच्या वृत्तीला कंटाळून पीडित मुलींनी संपूर्ण हकीकत वसतीगृह अधीक्षकांना सांगितली. यानंतर अधीक्षकांनी मुलींना सोबत घेऊन थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि अतिशय कडक अशा पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून थेट आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group