MPSC पेपरफुटी प्रकरणाने राज्यात एकच खळबळ निर्माण झाली असून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे घडवण्याची जबाबदारी असलेल्या आणि आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या शिक्षकाचेच नाव पेपरफुटी प्रकरणातील आरोपी म्हणून समोर आले आहे. तपासात प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रासह MPSC परीक्षेच्या पारदर्शकतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एमपीएससी पेपर फुटीचे धागेदोरे नंदुरबार जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटक करण्यात आहे. ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील त्यांच्यासोबतच ५ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली. ऋतुजा पाटील आणि तिच्या प्रियकर दोघेही फरार होते. अखेर पोलिसांनी ऋतुजाचा प्रियकर गौरव पाटीलला देखील अटक केली आहे. अमृत पाटील आणि गौरव पाटील यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आलं असून त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सहाही आरोपींना न्यायालयाने २ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी असलेले ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तिची आई नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. पाटील दांपत्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता
आरोपी अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अमृत पाटील हे मुख्याध्यापक म्हणून तर त्यांच्या पत्नी उज्वला पाटील शिक्षक म्हणून परिवर्धा जिल्हा परिषद शाळे कार्यरत होते. अमृत पाटील यांच्यावर कारवाईनंतर शाळेतील त्यांच्या सहकारी शिक्षकांनी भावना व्यक्त केली. अमृत पाटील यांच्या स्वभावाबद्दल त्याचे सहकारी शिक्षकांनी माहिती दिली.
एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आणखी एक नवा चेहरा समोर आला आहे. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांच्यात पेपर फुटी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या मयूर आबाजी ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याततत आला आहे. आरोपी मयूर ठाकरे हे नंदुरबारच्या एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पेपर फुटीप्रकरणात मयूर ठाकरे यांनी संचालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यात या विषयात भेट घडवून आणली होती. या संपूर्ण प्रकारात आता मध्यस्थी करणाऱ्या शिक्षक मयूर ठाकरे कायद्याच्या कचाट्यात सापडले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.