अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाआधीच फटाके फोडण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिवाळीआधीच मुंबईतील रहदारीच्या रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ते ४ डिसेंबरपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यास बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी फटाके फोडण्याबाबत मुंबई पोलिसांनी नियम जाहीर केले आहे. या नियमानुसार मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर फटाके फोडल्यावर कारवाई केली जाणार आहे. मुंबईत होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हे नियम ६ ऑक्टोबर म्हणजेच आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ४ डिसेंबरपर्यंत हे नियम लागू असणार आहे. त्यामुळे या कालावधीत जर कुणी नियमांचे उल्लंघन केले तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत.
मुंबईमध्ये लेझर लाईट आणि सर्च लाइट बीम्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे. वायू आणि ध्वनीप्रदूषणामुळं होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेऊन स्वतःहून याचिका दाखल केली होती. यासंदर्भात हायकोर्टानं २२ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश जारी केले होते. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.