नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपचा करारनामा करून जबरदस्तीने लैंगिक संबंधातून गर्भवती झाल्यानंतर तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी धनंजय ऊर्फ सोनू जयद्रथ काकडे (वय 33) व त्याचे साथीदार हर्षद सुरवडे, अमन, मोनिका जयद्रथ कापडे (वय 29), दंगल ऊर्फ कनिष्क काकडे (वय 28, सर्व रा. रोकडोबावाडी, उपनगर) यांनी फिर्यादी तरुणीस वेळोवेळी हॉटेल ग्रेट मराठा, मीना बझार, नाशिकरोड, तसेच हिमालय सोसायटीतील फ्लॅटमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखविले, तसेच फिर्यादीसोबत लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपचा करारनामा करून पीडितेशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पीडिता गर्भवती झाल्यानंतर तीन वेळा तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर पुन्हा फिर्यादी गर्भवती असताना दि. 23 सप्टेंबर रोजी पीडितेला चारचाकी गाडीत बसवून तिच्या पोटातील बाळ काढण्याच्या उद्देशाने नांदूर नाका मार्गे विंचूरच्या मागे असलेल्या एका लॉन्सच्या जवळ गाडी थांबवून पीडितेला गाडीखाली उतरविले.तिला मारहाण करून पोटात लाथ मारली.
तसेच आरोपी धनंजय काकडे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या विरोधात असलेले पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पीडितेकडील मोबाईल फोन फोडला. हा प्रकार दि. 28 ऑक्टोबर 2024 ते दि. 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.